मी स्पष्टीकरण देण्यास आलेलो नाही, फक्त माझी भूमिका हिंदीतून सांगण्यासाठी आलेलो आहे- राज ठाकरे

Foto

मुंबई- उत्तर भारतीय महापंचायत समितीचे निमंत्रण स्विकारल्यापासून राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावरुन काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. रविवारी(ता.२) आयोजित उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना चांगलेच खडेबोल सुनावले. भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणाले की माझी जी भूमिका आधीपासून होती ती आजही तशीच असून मी फक्त हिंदीत समजवण्यासाठी इथे आलेलो आहे असे राज ठाकरे म्हणाले.

कोणी कुठेही जाऊन राहु शकत, काम करु शकत असे असले तरी जिथे जाल तिथल्या भाषेचा, संस्कृतीचा आदर करायला शिका, आणि तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही याचे भान ठेवा अशा शब्दात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना सुनावले. उत्तर भारतीय लोक हे दुसऱ्या राज्यात रोजगार शोधण्यासाठी जातात कारण फक्त उत्तर भारतीय नेत्यांच्या कर्मदरीद्रीपणामुळे. त्यामुळे दुसऱ्या राज्यात न जाता तिथल्याच नेत्यांना तुम्ही जाब विचारायला हवा असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

पहिल्यांदा आपण आपला देश समजला पाहिजे. आपल्या देशाची राज्यघटना, कायदा काय सांगतो हे समजले पाहिजे, त्यामुळे इतर गोष्टी सहज होतील.

या देशातील व्यक्ती कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो असं म्हटले जाते. पण कायदा कोणी वाचला आहे असे वाटत नाही. एक राज्य सोडून येता तेव्हा तुम्हाला पोलीस ठाण्यात जाऊन सर्व माहिती देणे गरजेचे असते. एका राज्यातून आले आणि दुसऱ्या राज्यात गेले असे होत नाही. येथूनच खरी समस्या निर्माण होते.

जर महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध आहे, तर येथील तरुणांना प्रथम संधी मिळाली पाहिजे यामध्ये काय चुकीचे आहे. उद्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये इंडस्ट्री जात असेल तर तेथील लोकांना प्राथमिकता दिली पाहिजे.

 

माझ्या राज्यात मराठी तरुण-तरुणींना प्राथमिकता दिली पाहिजे, उरले तर इतरांना द्या. एखाद्या राज्यात गेल्यानंतर त्यांचा आदर केला पाहिजे.